नवी मुंबई : दि.1 ते 8 जुलै या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात संततधार मुसळधार पाऊस पडला असून आता काहीशी उघडीप मिळालेली आहे हे लक्षात घेऊन अभियांत्रिकी विभागाने रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरूस्तीची कामे युध्दपातळीवर करावीत तसेच सर्व विभागातील मॅनहोलच्या झाकणांची बारकाईने पाहणी करून एकही मॅनहोल झाकणाशिवाय राहणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अभियांत्रिकी विभागाच्या विशेष बैठकीप्रसंगी दिले. यावेळी शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड तसेच स्थापत्य, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत, यांत्रिकी, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
रस्ते खड्डेमुक्त राहतील याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देशित करताना आयुक्तांनी पेव्हर ब्लॉक ऐवजी अस्फाल्टींग व क्राँकिटीकरण साहित्याचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे रस्त्यांवर पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने पाणी साचलेल्या ठिकाणांची विशेष पाहणी करून पाणी साचून राहण्याची कारणे शोधावीत व आवश्यक उपाययोजना तत्परतेने करून घ्याव्यात असे निर्देश दिले.
रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेन होलची पातळी रस्त्याच्या पातळीच्या बरीच वर आहे अशाप्रकारे काही ठिकाणी ड्रेन होल आहेत ते रस्त्याच्या पातळीला येतील अशाप्रकारे मोठे करून घ्यावेत असे निर्देश आयुक्तांनी दिले. पाणी साचण्याच्या अतिसखल भागांमध्ये पाणी उपसा पंपांची अतिरिक्त व्यवस्था व उपसलेले पाणी कोणत्या बाजूच्या नाल्यात टाकल्याने वाहून जाईल याचीही काटेकोर पाहणी करण्याच्या व त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या.
नजिकच्या शहरांमध्ये उघड्या मॅनहोलमुळे दुर्घटना घडलेल्या आहेत, याचे भान राखत नवी मुंबईतील सर्व मॅनहोलवर भक्कम झाकणे असतील याची सर्व क्षेत्रात बारकाईने पाहणी करावी व त्याबाबत दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले. मॅनहोलच्या झाकणांखाली संरक्षक तारांची जाळी लावणेविषयी चाचणी करून उचित कार्यवाही करण्याचेही निर्देशित करण्यात आले.
पावसाच्या पाण्यामुळे महामार्गावर तसेच मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला माती व बारीक रेती जमा झाली असून ती उचलून घेऊन स्वच्छ करण्यासाठी तत्परतेने स्वच्छता मोहीम राबवावी त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला पडलेल्या डेब्रिजमुळे वाहत्या पाण्याला अडथळा हेत असेल त्याठिकाणी ते उचलून घेण्यात यावे असे सूचित करण्यात आले.
एमएसईडीसीएलच्या विद्युत लाईन्स अनेक ठिकाणी गटारांतून जात असल्याचे निदर्शनास येत असून त्या सुरक्षितपणे हलविण्याची जलद कार्यवाही करण्याचे त्यांना लेखी स्वरूपात कळवावे व विद्युत वाहिन्यांमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही याची गंभीरपणे दक्षता घेण्याचे व त्यादृष्टीने संपूर्ण क्षेत्रात पाहणी करण्याचे निर्देश विद्युत विभागास देण्यात आले.
सर्व विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांनी परस्पर समन्वय राखून एकमेकांच्या सहयोगाने नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कामे करावीत व आवश्यक उपायोजना जलद करून घेण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे असेही आयुक्तांच्या वतीने निर्देशित करण्यात आले.
पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या सूचना व तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे तसेच सर्व विभागांत पाणी वितरण समान होईल आणि पाण्याची गुणवत्ता उत्तम राहील याबाबत नियमित तपासणी करण्याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
मलप्रक्रिया केंद्रांच्या व्यवस्थापनाकडे पावसाळी कालावधीत विशेष लक्ष देतानाच मलनि:स्सारण वाहिन्या ओव्हर फ्लो होणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्याचेही निर्देशित करण्यात आले.
मा.पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून ‘कॅच द रेन’ अभियानास सुरूवात झालेली असून नागरिकांना पाणी वाचविण्याचे महत्व पटवून द्यावे व पावसाळी कालावधीत छतावरून वाहून जाणारे पाणी सोसायट्या, वसाहती यांनी संग्रहण करून ठेवण्याचे प्रकल्प राबविण्याबाबत त्यांना प्रोत्साहीत करण्याचेही आयुक्तांनी सूचित केले.
पावसाळी कालावधीत साथरोगाचे प्रमाण वाढते हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपले घर व घराच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी कारण साचलेल्या स्वच्छ पाण्यात डास अंडी घालतात, त्यामुळे पावसाळी कालावधीत स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे. तसेच एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा आणि आपल्या घरातील व सोसायटीमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने नवी मुंबईकर नागरिकांना करण्यात येत आहे.
