ठाणे, दि. 20 : पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या हद्दीत प्रस्तावित असलेल्या ‘माळशेज घाट- भोरांडे उदंचन प्रकल्पा’च्या (पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्ट) पर्यावरण विषयक मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेली जाहीर जनसुनावणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या १४ सप्टेंबर २००६ च्या अधिसूचनेतील तरतुदींनुसार, ‘मे. अदानी रिन्युएबल एनर्जी फिफ्टी टू (५२) लिमिटेड’ या उद्योग समूहाच्या वतीने या प्रकल्पाच्या पर्यावरणीय परवानगीसाठी प्रक्रिया सुरू आहे.
यानुषंगाने ठाणे जिल्ह्यात २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता जाहीर जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रकल्प पुणे आणि ठाणे अशा दोन्ही जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील याच प्रकल्पाची जनसुनावणी काही प्रशासकीय कारणांमुळे स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय सुसूत्रता राखण्यासाठी ठाणे जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता होणारी जाहीर जनसुनावणी देखील स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सुनावणीची पुढील तारीख प्रशासनाकडून नंतर जाहीर केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
