भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतीत जनजागृती व प्रोफायलिंग उपक्रम संपन्न
ठाणे, दि. २१ (जिल्हा परिषद, ठाणे) : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘NAMASTE Rural (National Action for Mechanised Sanitation Ecosystem)’ अभियानांतर्गत NAMASTE दिन मंगळवार, दि. १४ जुलै, २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश कचरा वेचक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रोफायलिंग करून त्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य संरक्षण, कौशल्य विकास आणि सन्मानजनक उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता.
NAMASTE Rural ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपाययोजना या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहेत. यामध्ये कचरा वेचकांचे सर्वेक्षण व प्रोफायलिंग, क्षमता विकास, सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य संरक्षण तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रमांचा समावेश आहे.
1या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी राज्यस्तरावरून प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन, गट विकास अधिकारी, जिल्हा सल्लागार, विस्तार अधिकारी, गट समन्वयक व समूह समन्वयक यांचे आभासी माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामपंचायत अधिकारी (सर्वेअर) यांचेही ऑनलाइन q पूर्ण करण्यात आले असून त्यानुसार प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षण व जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.
कोन ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमास सरपंच रेखा पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नितीन चव्हाण, जिल्हा सल्लागार दत्तात्रय सोळंके, मास्टर ट्रेनर ज्ञानेश्वर चंदे तसेच मोठ्या संख्येने कचरा वेचक व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांना NAMASTE योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच त्यांचे प्रोफायलिंग करण्यात आले.
योजनेअंतर्गत मिळणारे प्रमुख लाभ
NAMASTE योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत –
• NAMASTE ओळखपत्र
• वैयक्तिक सुरक्षा साहित्य (PPE Kit)
• आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा संरक्षण
• लाभार्थ्यांच्या मुलांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती
• व्यावसायिक सुरक्षा व कौशल्य विकास प्रशिक्षण
• District Waste Collection Centres (DWCCs) च्या माध्यमातून उद्योजक म्हणून विकसित होण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य
याबाबत प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन पंडित राठोड यांनी सांगितले की, NAMASTE Rural अभियानाचा उद्देश केवळ कचरा वेचकांचे सर्वेक्षण करणे नसून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांशी जोडून सुरक्षित, सन्मानजनक आणि शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये टप्प्याटप्प्याने प्रोफायलिंग, जनजागृती आणि लाभ वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत असून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
स्वच्छता कर्मचारी आणि कचरा वेचक हे समाजाच्या स्वच्छता व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या सुरक्षिततेला, आरोग्याला आणि सामाजिक सन्मानाला प्राधान्य देणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पात्र कचरा वेचक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के प्रोफायलिंग करून त्यांना NAMASTE योजनेच्या माध्यमातून उपलब्ध सर्व सुविधांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच संबंधित लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.
NAMASTE अभियानाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक संरक्षण, आरोग्य सुरक्षा, कौशल्य विकास आणि सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
