ठाणे दि.21(जिमाका):- तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे या नामांकित संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील विषम सत्राकरिता विविध विषयांच्या अभ्यागत अधिव्याख्यात्यांची तासिका तत्वावर भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील निवड प्रक्रियेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती रविवार, 28 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आल्या असून, उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी, उपयोजित यंत्रशास्त्र, विद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी आणि माहिती व तंत्रज्ञान या अभियांत्रिकी विभागांसह प्रवास व पर्यटन, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इंग्रजी व गणित या महत्त्वाच्या विषयांसाठी अध्यापकांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) नियमांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. अभियांत्रिकी शाखेसाठी संबंधित विषयात प्रथम श्रेणीतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इंग्रजी व गणित या विषयांसाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत.
मुलाखतीचे आयोजन 28 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय तंत्रनिकेतन, फडके पाडा, भारत गियर्स कंपनी समोर, खार्डीगाव, मुंब्रा, ठाणे येथे करण्यात आले असून, सर्व उमेदवारांनी सकाळी 10.00 वाजेपर्यंत नोंदणीसाठी उपस्थित राहावे. इच्छुकांनी स्वतःचा अद्ययावत बायोडाटा, सर्व मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रतींच्या संचासह स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना प्रचलित शासन निर्णयानुसार तासिकेप्रमाणे मानधन दिले जाईल. सदर नियुक्ती ही केवळ तात्पुरत्या स्वरूपातील तासिका तत्वावर असल्याने भविष्यात या सेवेवर नियमित होण्याचा कोणताही कायदेशीर हक्क किंवा दावा करता येणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकातील निकषांनुसार पार पडेल.
