चिपळूण, दि. ३ : संघटनात्मक आत्मपरीक्षण, वैचारिक स्पष्टता आणि भविष्यातील कार्यदिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने दिनांक २ व ३ ऑगस्ट २०२६ रोजी चिपळूण कोळकेवाडी येथील प्रयोगभूमी येथे दोन दिवसीय निवासी चिंतन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या शिबिराला सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर, अंनिसच्या राज्य सरचिटणीस आरती नाईक, कृष्णात कोरे, सचिन गोवळकर, जिल्हा कार्याध्यक्ष नंदलाल शिंदे, प्रधान सचिव सुहास शिगम, संदीप गोवळकर, राजापूर शाखेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत पाष्टे,सचिन मोहीते, हरिश्चंद्र फुकट तसेच जिल्ह्यातील विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या प्रारंभी जिल्हा संघटनेच्या गेल्या काही वर्षांतील कार्याचा चिकित्सक आढावा घेण्यात आला. यश, मर्यादा, संधी आणि आव्हाने यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
शिबिरातील ‘मेरी बात’ हे सत्र विशेष लक्षवेधी ठरले. या सत्रात प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या अनुभवांवर, संघटनेकडून असलेल्या अपेक्षांवर, भविष्यातील योगदानावर तसेच परस्पर विश्वास, संवाद आणि संघटनात्मक एकजूट अधिक दृढ करण्याच्या गरजेवर मनमोकळेपणाने विचार मांडले. या मुक्त संवादातून अनेक विधायक सूचना आणि सकारात्मक दिशा समोर आल्या.
त्यानंतर झालेल्या गटचर्चांमध्ये जिल्हा संघटनेची ताकद, मर्यादा, कमतरता, संभाव्य धोके, नव्या कार्यक्षेत्रांची आवश्यकता आणि भविष्यातील आव्हाने यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले.
वैचारिक सत्रात अंनिसच्या राज्य सरचिटणीस आरती नाईक यांनी “देवधर्म आणि नीती” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. समाजात कार्यकर्त्यांना वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना त्यांनी तर्कशुद्ध आणि उदाहरणाधारित उत्तरे देत अंनिसची भूमिका स्पष्ट केली.
त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही नास्तिकतेचा प्रचार करणारी संघटना नाही. विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी मूल्ये आणि संविधाननिष्ठ विचार यांचा प्रसार करणे हेच संघटनेचे ध्येय आहे. देवाच्या अस्तित्वाबाबत अज्ञेयवादी भूमिका स्वीकारत प्रत्येक व्यक्तीला तर्क, विवेक आणि पुराव्याच्या आधारे विचार करण्याची प्रेरणा देणे, हीच अंनिसची मूलभूत भूमिका आहे.
दोन दिवसांच्या या चिंतन शिबिरातून जिल्हा संघटनेने आत्मपरीक्षण, संवाद आणि वैचारिक स्पष्टतेच्या बळावर अधिक सक्षम, व्यापक आणि प्रभावी जनप्रबोधनाची दिशा निश्चित केली. आगामी काळात वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
