Oplus_16908288
श्रीलंका, दि. १० ऑगस्ट २०२६(क्रिकेटविश्व) : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात एक भन्नाट नाट्य पाहायला मिळाले.
Sri Lanka Cricket XI vs India 3-Day Warm-up Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात एक भन्नाट नाट्य पाहायला मिळाले. गोलंदाजीने फलंदाजांची दाणादाण उडवणारा मोहम्मद सिराज यावेळी बॅटिंगमध्येही हिरो ठरला. सामन्याच्या अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावांची गरज असताना सिराजने सलग तीन षटकार ठोकत टीम इंडियाला थरारक विजय मिळवून दिला. सिराजची ही फटकेबाजी पाहून श्रीलंका इलेव्हनचे खेळाडूही अक्षरशः अवाक् झाले.
अखेरच्या षटकात 16 धावांची गरज (Team India win Warm-up Match)
कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यात तीन दिवसांचा सराव सामना खेळला गेला. सामन्याच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी श्रीलंका इलेव्हनने आपला दुसरा डाव 200/6 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात भारताला सहा धावांची पिछाडी होती. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 207 धावांचे लक्ष्य होते. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी भारताला तुफानी सुरुवात करून दिली. दोघांनी शतकी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. मात्र सामना जसजसा शेवटाकडे गेला, तसतसा थरार वाढत गेला. भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात 16 धावांची आवश्यकता होती. सामना अनिर्णित राहणार असे वाटत असतानाच मोहम्मद सिराजने संपूर्ण चित्रच बदलून टाकले.
सिराजची ‘षटकारांची हॅट्ट्रिक’! (Mohammed Siraj hat-trick of sixes)
भारताच्या डावातील अखेरचे षटक नुवंता टाकण्यासाठी आला. स्ट्राइकवर मोहम्मद सिराज होता. पहिल्याच चेंडूवर सिराजने आपला पाय बाजूला घेत काऊ कॉर्नरच्या दिशेने असा जबरदस्त षटकार ठोकला की मैदानावर उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथवर टाकण्यात आला. सिराजने यावेळीही अजिबात चूक केली नाही आणि पुन्हा एकदा चेंडू थेट सीमारेषेपलीकडे पाठवला. आता भारताला विजयासाठी फक्त चार धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर सिराजने मिडविकेटच्या वरून आणखी एक भन्नाट षटकार खेचला आणि भारताने 6 विकेट्सने सामना जिंकला. सिराजने अवघ्या 15 चेंडूंमध्ये 32 धावांची नाबाद धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 1 चौकार होता.
