मुंबई दि. १४ : राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन २० ऑगस्ट यांच्या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई यांच्या विद्यमाने ‘रील २०२६’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून तरुणाईच्या सर्जनशीलतेला आणि सामाजिक विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच लोकशाही, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्यांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी ६० सेकंदांपर्यंतचा एक लघुचलचित्रफीत (रील) तयार करून सादर करायची आहे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून लघुचलचित्रफीत मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तयार करता येणार आहे. एका व्यक्तीला केवळ एका लघुचलचित्रफितीद्वारे सहभागी होता येईल.
स्पर्धेसाठी ‘लोकशाही’, ‘नव्या पिढीचा भारत’, ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’, ‘हिंसाचाराविरुद्ध मानवता’ तसेच ‘शिकेल भारत… तेव्हाच प्रगती करेल भारत’ हे विषय देण्यात आले आहेत. या विषयांच्या माध्यमातून तरुणांनी आपल्या सर्जनशीलतेतून सामाजिक प्रश्न, लोकशाही मूल्ये, शिक्षण, वैज्ञानिक विचार आणि मानवतावादी दृष्टिकोन प्रभावीपणे मांडावा.
स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी लघुचलचित्रफीत २० ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवायची आहे. लघुचलचित्रफितीची कमाल वेळ ६० सेकंद असावी. लघुचलचित्रफितीत कोणत्याही धर्म, जात, भाषा, प्रदेश किंवा व्यक्तीविरुद्ध द्वेषपूर्ण अथवा आक्षेपार्ह मजकूर असता कामा नये, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्पर्धेतील प्रवेश व रील पाठवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी प्रवीण – ८२८६६४४५०४, संदेश – ९१६७५९१७९५, विश्वजीत – ९८१९९४७०१४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष यश सुर्यवंशी यांनी केले आहे.
