ठाणे, दि. ०२ जुलै २०२६ : जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ तसेच महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी नियम, २००० अंतर्गत जन्म, मृत्यू व उपजत मृत्यू घटनांची नोंदणी करणे ही प्रत्येक नागरिकाची कायदेशीर जबाबदारी असून राज्याचे मुख्य निबंधक, जन्म-मृत्यू, महाराष्ट्र राज्य यांनी जारी केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (SOP) सर्व संबंधित निबंधकांनी कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका तसेच शासकीय व खासगी आरोग्य संस्थांमधील निबंधकांना याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. नव्या कार्यपद्धतीनुसार बालकाच्या जन्मानंतर २१ दिवसांच्या कालावधीत जन्मनोंदणी न झाल्यास संबंधित प्रकरणाची सखोल पडताळणी जिल्हा स्तरावरून करण्यात येणार आहे.
नागरिकांनी जन्म अथवा मृत्यू घटना घडल्यानंतर निर्धारित मुदतीत संबंधित निबंधक कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह माहिती सादर करणे बंधनकारक आहे. चुकीची माहिती देणे, बनावट कागदपत्रे सादर करणे किंवा अवैध मार्गाने प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करणे हे कायदेशीर कारवाईस पात्र ठरू शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जुन्या जन्म व मृत्यू नोंदींचे डिजिटायझेशन आणि डिजिटल प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली (CRS Portal) मध्ये अधिक सुरक्षित उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. जुन्या नोंदींना जिल्हास्तरावर मान्यता देण्यासाठी खालील तीन कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत—
• जुन्या जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्राची स्कॅन प्रत,
• संबंधित निबंधक कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदवहीतील मूळ नोंदीची प्रत,
• अर्जदाराने संबंधित निबंधकाकडे केलेल्या अर्जाची प्रत (निबंधकाची सही व शिक्क्यासह).
सदर कागदपत्रांची CRS पोर्टलवर जिल्हास्तरावर पडताळणी केल्यानंतरच जुन्या जन्म-मृत्यू नोंदींना मंजुरी दिली जाईल. जिल्हा निबंधकांकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर संबंधित निबंधकांकडून डिजिटाइज्ड प्रमाणपत्रे जारी केली जातील. आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील, असे डॉ. परगे यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यातील सर्व निबंधकांना जन्म-मृत्यू नोंदणीची सर्व कामे केवळ Civil Registration System (CRS) Portal द्वारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष दक्षता घेतली जात असून नागरिकांनीही प्रमाणपत्रे केवळ अधिकृत CRS पोर्टलमधूनच प्राप्त करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव म्हणाले, “जन्म आणि मृत्यू नोंदणी ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून प्रत्येक नागरिकाच्या कायदेशीर ओळखीचा मूलभूत आधार आहे. शासनाने निर्धारित केलेल्या कालमर्यादेत नोंदणी केल्यास शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होते. पारदर्शक व सुरक्षित सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून सर्व नागरिकांनी अधिकृत CRS प्रणालीचा वापर करून या प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करावे.”
जन्म-मृत्यू नोंदणी ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून सर्वांनी नियमांचे पालन करून विहित मुदतीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
