ठाणे, दि.10 : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या महास्वयंम (http//rojgar. mahaswayam.gov.in) या पोर्टलवर नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपले प्रोफाईल तात्काळ अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी केले आहे.
खाजगी किंवा शासकीय आस्थापनांकडून होणा-या रिक्त पदांसाठी पसंतीक्रम नोंदविणे, राज्यभरातील वेळोवेळी आयोजित होणा-या विविध ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळविणे, रोजगार मेळाव्यात ऑनलईन सहभाग नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्याक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदविणे तसेच केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देणा-या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, यासाठी आपली प्रोफाईल अद्ययावत करुन घ्यावे. यामध्ये उदा. आपले आधार कार्ड, शैक्षणीक पात्रता, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल इत्यादि माहिती अद्यावत करावी.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे, जुने कोषागर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे-400601 या कार्यालयाच्या पत्यावर ई-मेल (asstdiremp.thane@ese.maharashtra.gov.in ) अथवा दुरध्वनी क्र. 022-25428300 वर संपर्क साधावा.

