ठाणे दि.19 :- जिल्हाधिकारी कार्यालयात 7 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार आहे. या मध्ये तक्रार करण्यासाठी नागरिकांनीआपले अर्ज 21 जानेवारी 2022 पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेत पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना निर्बंधामुळे शासनाने निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करून परिस्थितीनुरुप व शक्य असल्यास दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) अथवा प्रत्यक्ष उपस्थितीत लोकशाही दिन आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, येत्या दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी दु. 1 वा. नियोजन भवनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीचे तक्रार अर्ज दि.21 जानेवारी 2022 पूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदणी शाखेमध्ये पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराची तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असणे आवश्यक आहे. लोकशाही दिनामध्ये तक्रार करण्यापूर्वी अर्जदाराने प्रथम संबंधित कार्यालयाकडे तसेच त्यांचे वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी. तेथे केलेल्या तक्रारीचे प्रती लोकशाही दिनी सादर करावयाच्या अर्जासोबत जोडाव्यात. एका तक्रार अर्जात एकच तक्रार असावी. एकापेक्षा अनेक तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रारदाराने प्रथम तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज केला नसल्यास, सदरहु अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये स्विकारला जाणार नाही. प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असल्यास अर्ज थेट स्विकारण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
लोकशाही दिनामध्ये अर्ज करताना तक्रारदार कोणत्या माध्यमातून (Video Conferencing, Google Meet, Zoom App) अथवा समक्ष लोकशाही दिनामध्ये सहभागी होणार आहे, याबाबत अर्जामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा. तसेच अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक अंतर्भूत करावा जेणेकरुन लोकशाही दिनामध्ये माध्यमाद्वारे उपस्थित राहता येईल, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

