सोमवारपासून होणार पुन्हा सुरू
ठाणे, दि. 21 (जिमाका) :- कोवीडविषयक सर्व नियमाचे पालन करुन ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक (नर्सरी ते सिनियर केजी) शाळा येत्या 24 जानेवारी 2022 पासून प्रत्यक्ष सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत.
राज्य शासनाने स्थानिक परिस्थिती पाहून राज्यातील प्राथमिक शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या आदेशात असे म्हटले आहे की, कोवीड विषयक सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक (नर्सरी ते सिनियर केजी) चे वर्ग प्रत्यक्ष सुरु करण्यात यावेत. त्यासाठी शासनाच्या सुचनेनुसार, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेण्यात यावे. तसेच ज्यांचे संमतीपत्र प्राप्त होणार नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु ठेवावेत. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित रहावे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसींच्या दोन्ही मात्रा झालेले असावे. तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.

