नागरिकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन
ठाणे दि. २४ जाने : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील तब्बल ८५ लसीकरण केंद्रावर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे तसेच १८ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी केले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनी मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी ,शहापूर या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, उप रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ठाणे शहरात असणारे सामान्य रुग्णालय आदि ८५ लसीकरण केंद्रावर नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस घेता येणार आहे.
आरोग्य विभागामार्फत १५ ते १८ वयोगट, १८ ते ४५ वयोगट, ४५ ते ६० वयोगट आणि त्यापुढील लाभार्थ्यांना करोना प्रतिबंधक पहिला व दुसरा डोस तसेच ६० वर्षावरील, फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी यांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. तरी या लस महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य उप संचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी केले आहे.
—————-००००००० ——————-
जनसंपर्क कक्ष, जिल्हा परिषद, ठाणे

