मुंबई, २७ जाने : मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती अस्मिता वैद्य यांचे वेतन संरक्षित करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
या प्रस्तावानुसार श्रीमती वैद्य यांची यापुर्वीची अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सेवा विचारात घेऊन, त्यांचे प्राचार्य पदाचे वेतन संरक्षित करण्यास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली. शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई हे महाराष्ट्रातील शासनाचे एकमेव अत्यंत प्रतिष्ठीत असे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचा दर्जा सर्वस्वी प्राचार्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. त्यामुळे या महाविद्यालयातील प्राचार्य पद भरणे आवश्यक असल्याने, मंत्रीमंडळाची कार्योत्तर मान्यता घेण्याच्या अटीवर प्राचार्य पदावर रुजु करुन घेण्यात आले होते. त्यानुसार श्रीमती वैद्य यांचे पूर्वीच्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य पदाचे वेतन संरक्षित करण्यास मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी एक अपवादात्मक बाब म्हणून तसेच या प्रकरणाचा अन्य प्रकरणी पूर्वोदाहरण म्हणून उपयोग करता येणार नाही या अटीच्या अधिन राहून देण्यात आली आहे.
