ठाणे, दि.8 : कृषि विभागाच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणांकरीता सहाय्य (आत्मा) कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हास्तरीय आत्मा नियामक मंडळात 11 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी कळविली आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आत्मा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा नियामक मंडळ, आत्मा व्यवस्थापन समिती, जिल्हास्तरीय शेतकरी सल्लागार समिती स्थापना करणे तसेच तालुका स्तरावर तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीची पुनर्रचना करण्याबाबत कृषि आयुक्तालयाने कळविले होते. जिल्ह्यात शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष शेतात येणाऱ्या अडचणी, शेतकरी बांधवानी निर्मित केलेले तंत्रज्ञान, सूचना मांडण्यास या समितीच्या शिफारशी उपयोगी पडतात. ठाणे जिल्हास्तरावरील जिल्हा नियामक मंडळ स्थापना करण्यासाठी मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या शिफारशीने अशासकीय सदस्यांची नावे कृषि आयुक्तांकडे पाठविली होती. या प्रस्तावास कृषि आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
त्यानुसार, ठाणे जिल्हा आत्मा नियामक मंडळावर खालील 11 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समिती सदस्यांचा कालावधी दोन वर्षांसाठी असेल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. वाघ यांनी कळविले आहे.
समिती सदस्यांची नावे नाव, पत्ता व निवडीचे कार्यक्षेत्र :- रुपेश चोरगे (मु.पो. गोवेली ता. कल्याण पशुधन उत्पादन). श्रीम. विजया अरविंद पोटे (मु. पो. कोळीब, ता. कल्याण, मत्स्यपालन शेतकरी प्रतिनिधी), राजेश चंद्रकांत वाघे (मु. पो. खर्डी शहापुर, प्रगतशिल शेतकरी-अन्नधान्य पिके), विलास गणपत देशमुख (मु.पो. काराव, ता. उल्हासनगर, प्रगतशिल शेतकरी-फलोत्पादन). मनिषा रविंद्र लोणे (मु.पो. नडगाव, ता. कल्याण, महिला प्रतिनिधी -अन्न सुरक्षा गट), अरविंद नथु घोलप (मु. पो. नारिवली, ता. मुरबाड, शेतकरी गटाचे प्रतिनिधी), चंदू कापडी (मु.पो. कळमखांड, ता. मुरबाड, मागासवर्गीय शेतकरी प्रतिनिधी), राजेश गडगे (मु.पो. अंदाड, ता. शहापूर, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी), रंजना सातपुते (मु. पो. नेहरोली, ता. शहापूर, ठाणे निविष्ठा वितरक प्रतिनिधी), पद्माकर मालु गोंधळी (मु.पो. मानिवली, ता. मुरबाड, ठाणे निविष्ठा पुरवठादार), बुधाजी बाबु बंगाल (मु.पो. माणगाव, ता. मुरबाड शेतकरी उत्पादन कंपनी प्रतिनिधी).
