ठाणे दि. 11 :- शहर व परिसरात होळी, धुलीवंदन, शब्बे बारात, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे ), रंगपंचमी असे सण / उत्सव तसेच इयत्ता बारावी उच्च माध्यमिक व दहावी माध्यमिक परीक्षा होणार आहे, या पार्शवभूमिवर ठाणे पोलीस आयुक्तालय परीसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे तसेच पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई आदेश जारी केले आहे.
जे कर्मचारी किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल किंवा ज्यास अधिकारी प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे, अशांना हे मनाई आदेश लागू नाहीत.
सदर आदेश पुढील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत. लग्न कार्यासाठी जमलेले लोक. प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा / मिरवणुका. सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.
सदर मनाई आदेश दि. 11 मार्च 2022 रोजी 00.01 वाजेपासून दि. 25 मार्च 2022 रोजी 24.00 वाजपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी कळविले आहे.
