ठाणे, दि. 13 मार्च : कोरोनामुळे स्तब्ध झालेली बोर्ड परीक्षा यंदा 15 तारखेपासून सुरु होत आहे. महागाई जरी स्थिर असली तरी जनतेचा खिसा मात्र निम्म्याहून कमीच भरत आहे. शहरी असो वा ग्रामीण भाग अजूनही पूर्वपदावर आलेला नाही. आर्थिक परिस्थिती नाजुकच आहे. अशा परिस्थितीत कसा बसा झालेला अभ्यास आणि येणारी परीक्षा याची सांगड जुळण विद्यार्थ्यांना अवघडच जाणारी. याचा वेध घेऊन राजे संस्कार प्रतिष्ठानने आदिवासी पाड्यातील गोरगरीब विद्यार्थांना मोलाचा हातभार लावला. आगामी परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप केले.
ठाण्यातील प्रा. संभाजी शेळके यांच्या राजे संस्कार प्रतिष्ठान या संस्थेने शालांत अर्थात दहावी बोर्ड परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर रविवार १३ मार्च राेजी मुरबाड भागातील सरळगाव, मानवली, कुडाची वाडी येथील वसतिगृह आणि आदिवासी वस्तीमध्ये जाऊन परीक्षेला सामोरे जाणाऱ्या मुलांना परीक्षेसाठी अडचण येऊ नये म्हणून मुलांसाठी रायटिंग पॅड, पट्टी, पेन्सिल, पाण्याची बॉटल, खाऊ आणि कपडे इत्यादी साहित्यांचे वाटप केले आणि विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामध्ये श्री. संजय पाटील, ऐश्वर्या माने, कविता रघुवंशी, मिनाक्षी कचरे, राजश्री सुर्यवंशी व कौस्तुभ रघुवंशी इत्यादींनी सहभाग घेतला होता.
