मुंबई, दि. 23 : मुंबईतील कुर्ला येथील कृष्णलाल मारवाह मार्गावरील सात मीटर रूंदीच्या मारवाह पुलाच्या पुनर्बांधणीचे काम ए.आर.कन्स्ट्रक्शन कंपनीला महापालिकेच्या स्थायी समितीच्या ठरावानुसार देण्यात आले होते. सन 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या पूलाला तडे गेल्याने तसेच स्लॅबच्या सळ्यांना गंज लागल्यामुळे हा पुल धोकादायक असल्याने तो बंद करण्यात आला होता. त्याचप्रमाणे कोविड काळात सेव्हन हिल्स हॉस्पिटलला जाण्याकरिता 5 ते 6 किलोमीटर अंतर वळसा घालून जावे लागत असल्याने या पुलाची तात्काळ दुरूस्ती करणे आवश्यक होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियम 1988 च्या कलमान्वये स्थायी समितीच्या ठरावानुसार हे काम ए.आर.कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. नवीन निविदा प्रक्रिया केली असती तर याकरिता जास्तीची रक्कम मोजावी लागली असती. आमदार व खासदार यांनी मागणी केल्यामुळे हे दुरूस्तीचे काम करण्यात आले आहे. त्यावेळेची निकडीची बाब म्हणून हे काम करण्यात आले असून यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही अशी माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटील, भाई गिरकर, प्रवीण दटके, राजहंस सिंग यांनी विचारला होता.
या मारवाह पुलाचे काम महानगरपालिकेच्या 2013 च्या दरसुचीनुसार देण्यात आले आहे. त्यामुळे सन 2018 ची दरसूची पाहता या अतिरिक्त कामाचे कंत्राट दर रूपये 11.84 कोटी इतके आहे. त्याचबरोबर सदर कामासाठीची कोणतीही रक्कम अद्याप कंत्राटदारांस देण्यात आली नसल्याचेही श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
