ठाणे, दि. 13 : नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी गठित समर्पित आयोगाने विभागनिहाय भेटीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हा आयोग बुधवार, दि. 25 मे 2022 रोजी कोकण विभागीय कार्यालयात दु. 2.30 ते 4.30 या वेळेत भेट देणार असून यावेळी नागरिकांना निवेदने देता येतील. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी भेटीच्या दिनांकापूर्वी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी हा समर्पित आयोग विभागनिहाय भेटी देणार आहे.
त्यानुसार, कोंकण विभागात दि. 25 मे 2022 रोजी आयोगाचा दौरा होणार आहे. कोंकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दु. 2.30 ते 4.30 या वेळेत नागरिकांना आयोगाची भेट घेता येईल. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
