ठाणे दि. १९ : जिल्हात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्हातील २०२४ बालकांची निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी २७ मे २०२२ पर्यंत पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ . भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.
प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलोटमेंट लेटर (allotment letter) ची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका अथवा महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्रथम पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करावीत. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाले असतील परंतू फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी आदी सूचना शिक्षण विभागाने पालकांना दिल्या आहेत. तसेच प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका / मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
