ठाणे, दि. 27 – प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत येत्या 30 मे 2022 रोजी अनाथ बालकांना लाभ वितरण कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वेबकास्ट/व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील निवडक अनाथ बालकांशी संवाद साधणार असून या कार्यक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील अनाथ मुलेही सहभागी होणार आहेत. यावेळी जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्ह्यातील 43 अनाथ बालकांना स्नेह प्रमाणपत्र व मा. प्रधानमंत्री यांचे पत्र देण्यात येणार असून विविध लाभांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत अनाथ बालकांसाठी विविध लाभ देण्यात येतात. या अंतर्गत प्रधानमंत्री श्री. मोदी हे सोमवारी देशभरातील अनाथ बालकांशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधणार आहेत. यामध्ये 18 वर्षावरील अनाथ मुले हे प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी उपस्थित असणार असून 18 वर्षाखालील मुले ही वेबकास्टद्वारे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील 43 अनाथ बालकेही या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी होणार आहेत. या बालकांना मा. प्रधानमंत्री यांचे पत्र, पीएम केअर योजनेचे स्नेह प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेचे कार्ड, पोस्ट खात्याचे पासबुक आदींचे वितरण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील या बालकांचे सध्याचे पालक/नातेवाईक, लोकप्रतिनिधी, बालकल्याण समितीचे सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य हेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
