शहरी व ग्रामीण भागात ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, अशा भागातील प्रत्येक कुटुंबाला पुरेसे पाणी मिळावे, कुटुंबातील महिलांना पाण्यासाठी दूरवर जावे लागू नयेत, तसेच प्रत्येक कुटुंबास पाईपलाईनच्या माध्यमातून वैयक्तिक नळ जोडण्या देण्याबरोबरच प्रत्येक माणसाला प्रति दिवशी ५५ लीटर शुद्ध पाणी मिळावे हा उद्देश ठेवून केंद्र शासनाच्या वतीने ‘जल जीवन मिशन’ ही योजना राबवली जात आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने ह्या योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून आजपर्यंत १ लाख ४२ हजार ९६१ कुटुंबाना वैयक्तिक नळ जोडण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील प्रत्येक खेड्यापाड्यातील घरापर्यंत नळ पोचविण्यासाठी सन २०२२ पासून केंद्रशासनाच्या वतीने “जल जीवन मिशन” (JJM) ही योजना राबवली जात आहे. हर घर जल अशी थिम घेऊन सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण २ लाख ५७ हजार ५७५ कुटुंबाना सन २०२४ पर्यत वैयक्तिक नळ जोडण्या करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यादृष्टीने शहापूर, कल्याण, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ आदी पाच तालुक्यात या योजनेतर्गत नळ जोडणी देण्याचे काम सुरू आहे.
या योजनेच्या कामासाठी केंद्र शासनाकडून ५० टक्के तर राज्य शासनाकडून ५० टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीच्या ८२९ कामांचा २७४. १२ कोटींचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यातील समाविष्ट ८२९ कामापैकी ५९७ कामांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. तर ३५४ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ३१२ योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन २३० कामांची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. या 230 पैकी 207 कामांचे कार्यादेश देखील देण्यात आले आहेत. आतापर्यत एकूण ७६ कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून १३१ कामे प्रगतीपथावर आहेत.
या योजनेत जसे घरामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे, त्याप्रमाणेच जिल्ह्यातील १६६७ शाळांदेखील नळजोडणी करण्यात येणार आहे. आता पर्यत १३५६ शाळांची नळ जोडणी पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजेच ८३ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.शाळांबरोबरच १६२२ अंगणवाड्यांना देखील नळ जोडणी करण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. आता पर्यत १२७० अंगणवाड्यांमध्ये नळाने पाणीपुरवठा केला जात आहे. म्हणजे हे काम 78.29 टक्के पुर्ण झाले आहे. या योजनेतर्गत ग्राम पाणी व स्वच्छता समिती (VWSC) स्थापित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ७९२ गावांमध्ये गाव कृती आराखडा (VAP) तयार करण्यात आला आहे.
जल जीवन मिशनमुळे प्रत्येकाला पिण्यायोग्य पुरेसे पाणी उपलब्ध होत आहेच; पण शाळा आणि अंगणवाड्यामध्ये देखील पाण्याची सोय केली जात आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे हे व त्यांची टीम ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी झटत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे २०२४ च्या अगोदरच निर्धारित कुटुंबाना नळ जोडणी करून पाण्याची सोय उपलब्ध होईल, असा विश्वास अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी व्यक्त करतात.
ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी दूरवर जावे लागू नये, त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पुरेसे मिळावे, यासाठी जलजीवन मिशनचा उपयोग होत आहे. प्रत्येक घरात नळ जोडणी आल्यामुळे दूरवरील विहिरी अथवा नद्यांमध्ये जाऊन पाणी आणण्याचे कष्ट कमी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातही आता घरापर्यंत नळ जोडणी पोचविण्याचे काम सुरू आहे.
