उल्हासनगरातील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी
भाडेतत्वावरील इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
ठाणे, दि.10 : समाज कल्याण विभागाच्या वतीने उल्हासनगर येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या 75 क्षमता असलेल्या वसतीगृहासाठी भाडेतत्वावर खाजगी इमारत घेण्यात येणार आहे. अशी इमारत भाडेतत्वावर देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालक/विकासकांनी अर्ज करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.
वसतीगृहासाठीची ही खाजगी इमारत उल्हासनगर परिसरात अथवा उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ किंवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असावी. किमान 5000 ते 7500 चौ.फुट क्षेत्रफळ असावे. इमारतीमध्ये 10 स्वच्छतागृह व 10 स्नानगृहाची सुविधा असावी. इमारत अधिकृत असावी. मालकाकडे पूर्णत्वाचा दाखला असावा. सदर इमारतीचे भाडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरविल्यानुसार घेण्याबाबतचे संमतीपत्र मालकाने देणे आवश्यक असेल. या अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक इमारत मालक/ बांधकाम विकासक यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, 5 वा मजला, जिल्हाधिकारी इमारत, कोर्ट नाका, ठाणे (प) या कार्यालयाकडे व गृहपाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उल्हासनगर 5 यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करावे, असे श्री.इंगळे यांनी कळविले आहे.
