ठाणे, दि.18 : दि. ०१ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
राज्यात आगामी वर्षाच्या ०१ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सर्वसाधारणपणे चालु वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत करण्यात येतो. जेणेकरून आगामी वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येते. भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. तद्नुषंगाने मतदार नोंदणी नियम १९६० मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आता दि. ०१ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित वार्षिक पुनरिक्षण कार्यक्रम असेल व यामध्ये मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल. तद्नंतर त्याच वर्षातील दि. १ एप्रिल, १ जुलै आणि १ आक्टोबर हे अर्हता दिनांक असतील. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १ जानेवारी, या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करू शकतील.
या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रका प्रमाणे करण्यात येणार असल्याने सदर कार्यक्रमासाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून नेमण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक (BLA) यांना उपस्थित राहणेबाबत सुचना देणेकामी या जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आलेले आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी कळविले आहे.
असा असेल पुनरिक्षण कार्यक्रम
४ ऑगस्ट २२ ते २४ ऑक्टोंबर २०२२ याकालावधीत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार / समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दुर करणे, आयोगाच्या मानकापासून छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्रांच्या यादीला मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखणे ही कामे करण्यात येणार आहेत. कालावधी दि. ०४ ऑगस्ट, २०२२ (गुरूवार) ते दि. २४ आक्टोबर, २०२२ (सोमवार).
दि. २५ आक्टोबर, २०२२ (मंगळवार) ते दि.०७ नोव्हेंबर, २०२२ (सोमवार) या कालावेधीत नमुना 1 ते 8 तयार करणे, ०१ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करण्याची कामे होणार आहेत.
दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि.०९ नोव्हेंबर, २०२२ ते दि.०८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत.
दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार या कालावधीत विशेष मोहिम होणार आहे. दि. २६ डिसेंबर, २०२२ (सोमवार) पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे. दि.०३ जानेवारी, २०२३ (मंगळवार) पर्यंत अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई ही कामे करण्यात येणार आहेत. दि.०५ जानेवारी, २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
