मुंबई :10 सप्टेंबर चित्रलेखा(प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाला साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. मोठ्या मिरवणुकीनंतर तराफाच्या सहाय्याने लालबागच्या राजाचं गिरगावच्या समुद्रात विसर्जन करण्यात आलं.

लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला त्यावेळी भक्तांचा जनसागर उसळलेला पाहायला मिळाला. गणेशभक्तांनी लालबागच्या राजाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या अशी आरोळी दिली.
नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी 10 दिवसांत लाखो गणेशभक्तांनी हजेरी लावली. यंदा दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा दिसल्या.
कोरोनानंतर यंदा प्रथमच गणेश विसर्जनाच्या वेळी मुंबईच्या रस्त्यांवर तुडुंब गर्दी दिसली. रस्त्यालगतच्या इमारती, टेरेस, उड्डाणपूल येथे भाविकांनी लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती.
अनेक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भाविकांची गर्दी पाहता चोरांचा सुळसुळाट झाला. त्यांनी गर्दीचा फायदा घेत तब्बल 50 मोबाईल, सोन्याचे दागिने लंपास केले. त्याचा फटका गणेशभक्तांना बसला. याबाबत पोलीस तक्रार देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रारदारांची रांग लागली होती.
