मुंबई 20 सप्टेंबर चित्रलेखा (प्रतिनिधी) : राज्यात जनावरांवर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील जवळपास 27 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळं ठिक झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे. आज (20 सप्टेंबर) 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार असल्याचेही सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले. राज्यातील पशुसंवर्धन विभागाला काही सूचना दिल्या आहेत, त्यात मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर केलेले उपचार यामुळं राज्यातील लम्पी आजार आटोक्यात येत असल्याचे सिंह म्हणाले.
राज्यातील जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27 जिल्ह्यांमधील 1 हजार 108 गावांमध्ये 9 हजार 375 जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली असून, उर्वरित जनावरांव उपचार सुरु असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितलं.
राज्यासह देशात अनेक ठिकाणी लम्पी आजार जनावरांमध्ये वेगाने फैलावत असल्याने मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत लम्पीचा फैलाव टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रदर्शन, जत्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी प्राण्यांची ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निर्देशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार, असल्याचे पोलिसांनी सांगितले.
