मोहाली(पंजाब), दि. 21 सप्टेंबर (प्रतिनिधि) :
मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत 209 धावांचे मोठे लक्ष्य 6 गडी गमावून पूर्ण केले. भारताच्या या दणदणीत पराभवाची प्रमुख कारणं काय होती ते जाणून घेऊया.
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भुवनेश्वर कुमारला 19 वं षटक देणं भारतीय संघाला महागात पडल्याचं पाहायला मिळालं. त्याने 19 व्या षटकांत भुवनेश्वरने 16 धावा दिल्या. या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 षटकात 52 धावा दिल्या.
पराभवाचं प्रमुख कारण म्हणजे भारतीय टीमची खराब फिल्डींग. अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनी या सामन्यात एक सोपा कॅच सोडला. भारताच्या या खराब फिल्डींगमुळे हा सामना गमवावा लागला.
भुवनेश्वर कुमारप्रमाणेच भारताचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलही या सामन्यात काहिसा फिक्का पडल्याचा दिसून आला. त्याने 3.2 षटकात 42 धावा देऊन एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 2 धावांची गरज असताना सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याला विकेट मिळाली.
कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करेल असं वाटत होतं. मात्र ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये 21 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 45 धावांची तुफानी फटकेबाजी केली. सामन्यात भारतीय गोलंदाजांपैकी एकही गोलंदाज वेड ला अडचणीत आणू शकला नाही, ज्याची किंमत संघाला पराभवाच्या रूपाने चुकवावी लागली.
