राज्यात ७ ऑक्टोबरपर्यंत ११८०.४ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ११५.७ टक्के पाऊस झाला असून १४३.१० लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे अशी माहिती कृषी विभागातर्फे आज देण्यात आली.
“कोविडची सद्य:स्थिती“
सध्या राज्यात कोविडचा पॉझिटीव्हीटी दर २.५५ टक्के इतका असून सरासरी दररोज ४०० रुग्ण आढळतात. सध्या राज्यात २३८७ सक्रीय रुग्ण असून ४ जण व्हेंटिलेटरवर असून ३४ जण ऑक्सीजनवर आहेत. एकूण पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक अशा एकूण १७ कोटी ७२ लाख ४२ हजार ६१८ मात्रा देण्यात आले आहेत.
“योजनांचा आढावा“
केंद्र सरकार पुरस्कृत फ्लॅगशिप योजनांना अधिक गती देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. यावेळी बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), जलजीवन मिशन, प्रधानमंत्री किसान सन्मान, स्वामीत्व- ड्रोनद्वारे गावांचे सर्वेक्षण, मृद आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड), किसान क्रेडिट कार्ड, अटल पेन्शन योजना, स्वनिधी योजना त्याचप्रमाणे आयुष्मान भारत जनआरोग्य योजना व राज्य पुरस्कृत महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना यांचे सादरीकरण करण्यात आले.
“खेळाडुंचे अभिनंदन“
गुजरात येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकून पदक तालिकेत पहिला क्रमांक मिळविला आहे, त्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्राला एकूण सर्वाधिक १४० पदके मिळाली असून त्या खालोखाल हरियाणा व कर्नाटक ही राज्ये आहेत. या पदकांमध्ये ४० सुवर्ण पदके महाराष्ट्राला मिळाली आहेत.
महाराष्ट्रातील खेळाडुंच्या कामगिरीमुळे एकूणच राज्यातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळेल आणि देशात महाराष्ट्राचा दबदबा निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
