मुंबई : 18 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : शिंदे गटाचे आमदार
संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावरून मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान सोमवारपासून त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते.
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी ढासळली. सध्या शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.
मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत.
संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम येथील आमदार आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाटदेखील सामील होते. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात त्यांचा सहभाग होता.
