नवी दिल्ली, दि. 25 ऑक्टो (प्रतिनिधी) : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी 20 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर होतं. ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक आणि पेनी मॉर्डेंट यांच्या नावांचा विचार केला जात होता. ब्रिटिश संसदेत एकूण 357 टोरी खासदार आहेत. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी 100 खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता असते. त्यानंतर आता ऋषी सुनक यांचं नाव जाहीर करण्यात आलं.
ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी 45 दिवसांच्या कार्यकाळानंतर गुरुवारी अचानक राजीनामा दिला. लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.
त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.
