मुंबई : 1नोव्हेंबर(प्रतिनिधी)
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज होणाऱ्या सुनावणीवर राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. आज 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी होत आहे. दरम्यान पाच न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये न्या. धनंजय चंद्रचूड, न्या.एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या.हिमाकोहली, न्या. पी नरसिंहा यांचा समावेश आहे.
आजपासून पुन्हा या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर युक्तिवाद होणार आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगाने जी कारवाई केली त्याचाही उल्लेख आजच्या सुनावणीत होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 27 सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां बाबतचे प्रकरण आले नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
