मुंबई, दि.3 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : आज अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. एकतर्फी होणाऱ्या या लढतीत मतदारांना घराबाहेर काढण्याचं शिवसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे. मतदारांमधील निरुत्साहामुळेच शिवसेनेनं आपल्या हक्काच्या मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याकरिता कार्यकर्त्यांची फौज तयार ठेवलीय.
पोटनिवडणुकीसाठी तसाही बहुदा निरुत्साह असतो. सर्वसाधारण निवडणुकीच्या तुलनेत पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का देखील कमीच असतो. अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपच्या माघारीमुळे पोटनिवडणुकीतील चुरस संपली. भाजपच्या माघारीमुळे पोटनिवडणूक होणारच नाही, असे चित्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवरच मतदान किती होते याची शिवसेनेला चिंता आहे.
जास्तीत जास्त मताधिक्याने ही जागा जिंकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. आपले हक्काचे मतदार घराबाहेर पडावेत म्हणून शिवसेनेने आजूबाजूच्या परिसरातील शिवसैनिकांना अंधेरीत पाठविले आहे. घरोघरी जाऊन मतदानासाठी बाहेर या, असे आवाहन कार्यकर्ते मतदारांना करणार आहेत.
पोटनिवडणुकीतील चुरस संपल्याने मतदारांमध्येही निरुत्साह जाणवतो. तरीही आम्ही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदानासाठी बाहेर येण्याचे आवाहन केल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. मतदारांना घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान असेल. महाविकास आघाडीचे हक्काचे मतदार घराबाहेर पडतील, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
या मतदारसंघात एकूण अडीच लाखांहून अधिक मतदार असून 256 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात असून त्यात चार अपक्ष आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी साधारण 1 हजार 600 कर्मचारी कार्यरत असतील. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दल, राखीव पोलीस दल, निमलष्करी दल, गृहरक्षक दल यांचा समावेश असणार आहे. मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली असून या विभागात पैशाचे वाटप झाल्याची एकही घटना समोर आलेली नाही, तसेच या भागात एकही संवेदनशील मतदारसंघ नसल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. मतमोजणी रविवारी होणार आहे.
पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार
- ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), 2. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स), 3. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी), 4. नीना Ankush (अपक्ष), 5. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष),6.मिलिंद कांबळे (अपक्ष), 7. राजेश त्रिपाठी (अपक्ष)
