मुंबई :20 नोव्हेंबर(प्रतिनिधी) : महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यात तापमानात घट होताना पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिक थंडीपासून संरक्षणाबरोबरचं थंडीचा आनंद घेताना देखील पाहायला मिळताहेत. सध्या महाबळेश्वरमध्ये तापमान 10.4 अंशांवर तर वेण्णालेकमध्ये 6 अंशांवर घसरलंय. परभणीत तापमान 8.3 अंशांवर पोहोचलंय. नाशिकमध्येही हुडहुडी भरलेली पाहायला मिळतेय. पुण्यातही थंडीची चाहुल लागली आहे. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे.
मागच्या तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात थंडीची लाट तयार झाली आहे. तापमानात सातत्याने घसरण होत असताना तापमान 10 अंशावर होते तर आज तापमान हे 8.3 अंशापर्यंत घसरले आहे. यामुळे सर्वत्र थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणवू लागलाय.
ग्रामीण भागातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. शहरांमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागतोय.सर्वत्र नागरिक या गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत
महाबळेश्वरातील तापमानात आणखी घट झाली असून महाबळेश्वरातील तापमान 8 अंशावर तर वेण्णालेक 6 अंशावर गेले आहे. घसरलेल्या तापमानामुळे महाबळेश्वरवासीय आणि पर्यटक चांगलेच गारठले
नाशिकमध्ये किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याचं बघायला मिळत असून निफाडमध्ये 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची आज नोंद झाली आहे. आठवडाभरातच हा पारा तब्बल 6 अंशांनी घसरला आहे तर नाशिक शहरात देखील पारा 9.8 अशांवर येऊन पोहोचल्याने नाशिककर सध्या चांगलेच गारठले आहेत.
