ठाणे दि. 26 नोव्हेंबर :- कोकण विभागातील कृषि धारणा तसेच पीक रचनेनुसार पिकाच्या पेरणी पासून काढणीपश्चात प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफक दराने यांत्रिकीकरणाची सेवा सुविधा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे तसेच लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण सुविधेचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने कृषि विभागामार्फत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कृषी औजारे बँक स्थापण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य केले जात आहे. सन २०२२ -२३ या वर्षाकरिता कोंकण विभागासाठी कृषि यांत्रिकीकरण उपभियान आणि राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत एकूण रु. ४.६६ कोटी निधी प्रस्तावित केलेला आहे. विभागातील शेतकरी, शेतकरी गट, सहकारी संस्था, उत्पादक कंपन्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे कृषि सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.
कोंकण विभागात कृषि क्षेत्राकरिता कृषि यांत्रिकीकरण हे फार महत्वाचे आहे. दिवसेंदिवस शेतीकामाकरिता मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे कृषि क्षेत्रात कृषि औजारे आणि यंत्रे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. कोकण विभागात भात हे प्रमुख पिक असून चिखलणी, उखळणी, लागवड, फवारणी, काढणी सह सर्व प्रकारच्या कामाकरिता यंत्र उपलब्ध आहेत. कोकणातील धारणा क्षेत्र कमी असल्याने वैयक्तिक यंत्रे खरेदी करण्यास मर्यादा आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कृषी अवजारे बँक स्थापनेकरिता शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते. सन २०२२ -२३ या वर्षाकरिता कोंकण विभागाकरिता कृषि यांत्रिकीकरण उपभियान आणि राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत एकूण रु. ४.६६ कोटी निधी प्रस्तावित केलेला आहे. कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते.
| अ .क्र. | औजारे बँक स्थापनेचा खर्च | अनुदानाची उच्चतम मर्यादा | अर्थसहाय्य |
| १ | रु. १० लाख पर्यंत | रु. ४.०० लाख | ४० टक्के |
| २ | रु. २५.०० लाख पर्यंत | रु.१०.०० लाख | ४० टक्के |
कृषि औजारे बँकेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्जाद्वारे सादर करणे आवश्यक आहे. कृषी औजारे बँक या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट / नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांनी महाडीबीटी पोर्टल वर जास्तीत जास्त अर्ज सादर करून योजनेचा लाभ घेण्यात यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री. माने यांनी केले आहे.
