नवी दिल्ली, दि. 30 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय, ते 64 वर्षांचे होते. आज दुपारी 1 वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जातं. विक्रम किर्लोस्कर हे एमआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर होते. त्यांनी सीआयआय, एसआयएएम आणि एआरएआयमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय.
टोयोटा इंडिया कंपनीनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन याविषयीची माहिती दिली. कंपनीनं म्हटलंय की, “टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे 29 नोव्हेंबर 2022 रोजी अकाली निधन झालं. या वृत्तानं आम्ही खूप दुःखी आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत आहे. त्यांच्या पार्थिवावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. विक्रम किर्लोस्कर हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर होते आणि त्यांनी सीआयआय, एसआयएएम आणि एआरएआयमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समुहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देखील होते. त्याचबरोबर किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्षही होते.
