मुंबई, दि. 20 डिसेंबर (प्रतिनिधी) : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं होत. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. दरम्यान, या निवडणुकी बाबत जरी उत्सुकता असली तरी राज्यातील अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
राज्यात सत्तांतर झाल्यांनतर याचे काही पडसाद राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर पडणार काय हे देखील आज स्पष्ट होईल. दरम्यान थेट सरपंचाची निवड ही सुद्धा जनतेतून होणार आहे. अनेक दिगज्यांची प्रतिष्ठापना लागणार आहे.
ठाकरे की शिंदे? मतदारांचा कल…
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे गटाचा पाठिंबा वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटाला जास्त जागा मिळतात की ठाकरे गटाचा झेंडा सर्वाधिक ग्रामपंचायतींवर लागतो हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
