नागपूर : 21 डिसेंबर(प्रतिनिधी)
नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणावरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत असलेले विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे. विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी एनआयटी जमीन विक्री प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून निवदेन सादर होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये घनाघाती शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. आज तिसऱ्या दिवशीदेखील विरोधक सरकारला अनेक मुद्यांवरून घेरण्याच्या तयारी दिसून येत आहे.
राज्याची उपराजधानी नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाताहेत, बेळगावमध्ये मराठी भाषिकांवरील दडपशाही यासह विविध मुद्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. दुसरीकडं विरोधी पक्षांविरोधात शिंदे गटाचे आणि भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. संतांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी माफी मागण्याची मागणी भाजप आमदारांनी केली. तर, शिंदे गटाच्या आमदारांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ या घोषणेला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं पाहायाला मिळालं.
विधीमंडळात विविध मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरण, समृद्धी मार्गावरील गैरसोय आणि प्राण्यांच्या अपघाती मृत्यू मुद्दा, विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातील कामांना देण्यात आलेली स्थगिती, श्रद्धा वालकर हत्याकांड आदी मुद्यांवर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कामांच्या स्थगितीवरुन विधानसभेत शाब्दीक बाचाबाची झाली. समृद्धी मार्गावरील गैरसोय आणि प्राण्यांच्या अपघाती मृत्यू मुद्दा विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. समृद्धी महामार्गावरील चर्चेदरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावलेल्या टोल्यानंतर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांनी प्रतिटोला लगावला.
