27 डिसेंबर(प्रतिनिधी)
नागपूर : कोकणातील सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर विमानतळाच्या नामांतरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, विमानतळांना महापुरुषांची नावे देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. परंतु हे केवळ कागदोपत्री राहू नये. सुमारे तीन वर्षांपूर्वी संभाजीनगर येथील विमानतळाला ‘धर्मवीर संभाजीराजे भोसले’ यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. परंतु अद्याप त्यावर अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. याकडे विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
या प्रकरणाची दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य शासनाने केंद्र सरकारकडून संभाजीनगर विमानतळाच्या प्रलंबित नामांतरणाची सध्या काय स्थिती आहे. याची माहिती पंधरा दिवसात उपलब्ध करून द्यावी, असे शासनाला आदेश दिले आहेत
