मुंबई, दि. 11जाने : राष्ट्रीय बाजारात सोमवारी शुद्ध सोन्याचे (२४ कॅरेट) दर ६७२ रुपयांनी वाढून ५६,२५९ रुपये प्रति १० ग्रॅमच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले. २०२३ च्या पहिल्या १० दिवसांत सोने १,३९२ रुपये महागले आहे. औरंगाबादेतील स्थानिक दर ५६,८०० रुपये होते. बहुतांश गृहिणींकडे दोन ते अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र असतेच. दाेन-तीन दशकांपूर्वी अवघ्या १०-१२ हजारांना खरेदी केलेल्या मंगळसूत्राची किंमत आता लाखाच्या घरात गेली आहे. ३० वर्षांपूर्वी लग्न झालेल्या गृहिणींच्या मंगळसूत्राची किंमत १४ पट, तर १० वर्षांपूर्वी विवाह झालेल्या महिलांच्या मंगळसूत्राचे मूल्य आज दुपटीवर पोहोचले आहे.
सासू आणि सुनांच्या लग्नावेळी घेतलेल्या मंगळसूत्राची आजची किंमत किती… समजून घ्या या तीन गृहिणींच्या उदाहरणावरून
1258% वाढला सोन्याचा भाव ३० वर्षांत
9.23% महागली चांदी एकाच महिन्यात.
1993 : १०,३५० हजार रुपयांचे मंगळसूत्र झाले दीड लाख रुपयांचे
विजयाताईंच्या लग्नावेळी १९९३ मध्ये सोने ४,१४० रुपये तोळा होते. त्यांचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र १०,३५० हजारांचे होते. ३० वर्षांत त्याची आजची किंमत झाली आहे १ लाख ४४५७५ रुपये.
१९९३ : सोन्याचा भाव ४,१४० रुपये तोळा. तेव्हाची किंमत १०,३५० रुपये.
आजची किंमत १,४४,५७५ रुपये.
2003 : वीस वर्षांपूर्वी घेतलेल्या मंगळसूत्राचा भाव दुपटीने वधारला
कल्पनाच्या लग्नात २००३ मध्ये सोन्याचा भाव होता ५,६०० रुपये तोळे. त्यांचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र हाेते १६,८०० रुपयांचे. आज त्यांच्या मंगळसूत्राची किंमत आहे तब्बल पावणेदोन लाख रुपये.
२००३ : सोन्याचा भाव ५,६०० रु. तोळा,
तेव्हाची किंमत : १६,८०० रुपये,
आजची किंमत : १ लाख ७३,४९० रुपये.
2013 : दहा वर्षांपूर्वी घेतलेल्या मंगळसूत्राचीही किंमत वधारली.
स्नेहाच्या लग्नातही अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र केले होते. तेव्हा त्याची किंमत होती ७४ हजार रुपये. आज स्नेहाच्या मंगळसूत्राची किंमतही दुपटीने वाढून १ लाख ४४,५७५ रुपये झाली आहे.
२०१३ : सोन्याचा भाव २९,६०० रुपये दहा ग्रॅम
तेव्हाची किंमत ७४ हजार रुपये, आजची किंमत : १ लाख ४४,५७५.
मकर संक्रांतीपर्यंत ६० हजारांचा अंदाज
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता कुमार जैन म्हणाले, रशिया-युक्रेन युद्ध, आर्थिक दुर्बलता व अमेरिकेतील यील्ड बाँड तुटल्याने सोन्यावर परिणाम होत आहे. १४ जानेवारीनंतर सोन्याचा भाव ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
