पुणेः भीमा नदीपात्रात (Bhima River) एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या सहा दिवसांत एकामागून एक असे सात मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह एका कुटुंबातील आहेत. यामध्ये सासू-सासरे, जावई, मुलगी आणि तीन नातवंडांचा समावेश आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव हद्दीतील नदीपात्रात हे सर्व मृतदेह आढळून आले आहेत. हे सर्वजण मूळ बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. हे कुटुंब मजुरीसाठी नगर जिल्ह्यात आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. हा घातपात आहे की आत्महत्या या बाजूने तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकारी यांनी दिली आहे.
मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), पवार यांचे जावई श्याम पंडीत फुलवरे (वय २८ जावई), मुलगी राणी श्याम फुलवरे (वय २४ मुलगी), नातवंडे- रितेश फुलवरे (वय ०७), छोटू फुलवरे (वय ०५), कृष्णा फुलवरे (वय ३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी मृतदेहांची नावे आहेत. हे कुटुंब मूळचे मराठवाड्यातील आहेत. गेल्या वर्षभरापासून पवार, फुलवरे हे दोन्ही कुटुंब मजुरीसाठी नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथे आले होते. ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आले आहे. ती हद्द अहमदनगर जिल्ह्याच्या लगत आहेत.
दोन्ही अँगलने पोलिसांचा तपास याप्रकरणी बारामती
अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोयटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, घातपात आहे की सुसाइड या दोन्ही बाजूने पोलिस तपास करत आहेत. यवत पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, तसेच पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे पाच पथकेही तपास करत आहेत.
असे आढळत गेले मृतदेह भीमा नदीपात्रात गेल्या सहा दिवसांपासून एकामागून एक असे सात मृतदेह आढळून आले आहेत. १८ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर २१ जानेवारीला एका महिलेला मृतदेह आढळून आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. तर आज तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत.
महिलेजवळील मोबाइलमुळे पटली ओळख यातील एका महिलेच्या मृतदेहाजवळ मोबाइल आढळून आला. त्यावरून पोलिसांनी नातेवाइकांशी संपर्क साधला. नातेवाइक आल्यानंतर या मृतदेहांची ओळख पटली आहे. या सर्वांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
