भिवंडी, दि. 26 जाने-प्रदीप मुरूडकर(प्रतिनिधी) : ठाण्यातील भिवंडी खाडी लगत परिसरात आज सकाळी पहाटे तीन वाजता एका दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यु झाला असून, माजिद अन्सारी ( वय वर्षे २५) असे मृताचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अश्रफ नागोरी (वय 22 वर्षे) याची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
भिवंडी खाडी लगत मूळचंद कंपाऊंडमध्ये असलेल्या या इमारतीचा पहिला मजला पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. ही दुमजली इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी होती. त्यात कापडाचे गोदाम आणि कापड कंपनीचे कार्यालय होते. याच तळमजल्यावरील कपड्यांच्या दुकानात उपस्थित असलेल्या माजिद हबीब अन्सारी यांचा मृत्यू झाला. संबंधित इमारत धोकादायक असल्याची नोटीस महानगर पालिकेतर्फे देण्यात आली होती. ढिगाऱ्यात आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्याचे काम अग्निशमन दलातर्फे सुरू आहे.
