प्रतिनिधी ౹ ठाणे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला ९ व व १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालयच्या प्राचार्या प्रा. डॉ. हर्षला लिखिते, आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲड. सुयश प्रधान, आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डाॅ. वैदेही कोळंबकर, आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सीमा हर्डीकर, आनंद विश्व गुरुकुल कौशल्य प्रशिक्षण विभागाच्या समन्वयक मयुरा गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी (भाप्रसे) हे गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ९ फेब्रुवारी रोजी गुंफतील. ‘करिअर निवडताना’ या विषयावर भूषण गगराणी यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर हे असतील. गगराणी हा मारवाडी माणूस मराठी व इंग्रजीचा त्यांचा प्रचंड गाढा अभ्यास असलेली ही व्यक्ती भारतीय प्रशासकीय सेवेतील परिक्षेत असंख्य विद्यार्थांचे आयडाॅल म्हणून ओळखले जातात. विद्यमान ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे ही भूषण गगराणी यांना विद्यार्थी दशेत आपले आयडाॅल समजत असत. असे भूषण गगराणी हे आपल्या व्याख्यानातुन करिअर निवडण्याचे धडे देतील.तर दीपस्तंभ फाऊंडेशन, जळगावचे संस्थापक यजुर्वेद महाजन हे व्याख्यानमालेचे दुसरे षुष्प १० फेब्रुवारी रोजी गुंफतील. ‘माणूस घडण्यासाठी’ या विषयावर यजुर्वेद महाजन यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे असतील. जळगाव मधील ग्रामीण भागातील अंध, अपंग, बहिरे, लुळेपांगळे, अनाथ अशा महाराष्ट्रातील व विदेशातील ३५० मुलांना दत्तक घेऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसवितात १४०० वर्ग १, वर्ग २ अधिकारी म्हणून उत्तीर्ण झालेले आहेत. असे यजुर्वेद महाजन हे आपल्या व्याख्यानातुन माणूस घडविण्याचे धडे देतील. या व्याख्यानमालेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आवर्जून प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. योगायोगाने ९ फेब्रुवारी हा ना. एकनाथ शिंदेसाहेबांचा वाढदिवसही आहे, अशी माहिती प्रा. डाॅ. प्रदिप ढवळ यांनी दिली.
आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाची स्थापना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून झाली आहे. या महाविद्यालयात प्लेग्रुप पासून ते एलएलएम, पॅरामेडिकल, नर्सिग, फायर फायटिंग, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, सिनिअर कॉलेज पर्यंत सर्वच सेक्शन चालवित आहोत, एक मिशन म्हणून आम्ही सर्वजण काम करीत आहोत, याचे नाव आनंद विश्व गुरुकुल, हे दिघे साहेबांचे स्वप्न होते ते ना.एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामुळे प्रत्यक्ष अवतरले आहे. आज येथे ५५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आनंद दिघेसाहेब मला म्हणायचे, ‘ढवळसर अशी शाळा सुरु करा जिथे घंटा वाजविल्यावर मुले शाळेतुन पळता कामा नये तर शाळेच्या प्रांगणात रांगत राहिली पाहिजेत.’ या महाविद्यालयात विद्यार्थांच्या कलेला वाव देणा-या १७ ॲक्टीव्हिटी होतात. गुरुवर्य आनंद दिघे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचा राजकारणाबरोबरच सर्वच क्षेत्रात वावर होता. साहित्यिक, खेळाडू, विश्लेषक यांच्याशी त्यांचे घनिष्ट नाते होते. ठाणे शहरात पूर्वी अनेक व्याख्यानमाला व्हायच्या, आताही होत आहेत. मात्र आनंद दिघे यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरु व्हावी अशी आमची इच्छा होती. तिची पूर्तता आता आम्ही करत आहोत. आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक विद्यालय आणि विधी महाविद्यालय, मेंटल हॉस्पिटल जवळ, ठाणे येथे गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला ९ व १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.तरी या व्याख्यानमालेत सर्वांनी उपस्थितीत रहाव असे आवाहन प्रा. डाॅ. प्रदिप ढवळ यांनी केले आहे.
