प्रतिनिधी ౹ ठाणे
येत्या काळात १ कोटी दिव्यांग व अनाथ मुलांचे कल्याण करायचे धेय्य समोर ठेवले आहे. यात १०० टक्के नाही तर २०० टक्के यश मिळेल. ठरवले तर सर्व शक्य आहे, अशी आशा दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केली.
दीपस्तंभ फाऊंडेशन, जळगावचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन हे गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्यख्यानमालेचे दुसरे षुष्प गुंफताना ‘माणूस घडण्यासाठी’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे हे होते. यावेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ, आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालयच्या प्राचार्या प्रा. डॉ. हर्षला लिखिते, आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्याल याचे प्राचार्य ॲड. सुयश प्रधान, आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डाॅ. वैदेही कोळंबकर, आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्याल याच्या प्राचार्या डॉ सीमा हर्डीकर, आनंद विश्व गुरुकुल कौशल्य प्रशिक्षण विभागाच्या समन्वयक मयुरा गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
१ जुलै २०१८ साली सुरु झालेल्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पांतुन ग्रामीण भागातील अंध, अपंग, अनाथ अशा महाराष्ट्रातील व विदेशातील हजारो मुलांना दत्तक घेऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसविण्यात आहे. यासाठी १ लाख शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तर आजवर १० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील १४०० वर्ग १, वर्ग २ अधिकारी म्हणून उत्तीर्ण झालेले आहेत. मनोबल प्रकल्पांतर्गत अंध, अपंग, अनाथ मुलांना राहण्याची सोय, मोफत भोजनाची सोय, युपीएससी-एमपीएससी एम एस डब्ल्यू यासारख्या परीक्षांची तयारी करण्यासाठी त्यांना मोफत आणि निवासी प्रशिक्षण व मार्गदर्शन, बी इ, बी सी ए , बीबीए, बी कॉम, बीएससी, पीएचडी तसेच अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अशी सर्व सोयी मनोबल प्रकल्प देतो. संगणक प्रशिक्षण, संगीत, टेलरिंग, अभिनय यामध्ये आवड असणाऱ्यांना देखील शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. जे विद्यार्थी गरजू आहेत.त्यांच्या आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देखील दिली जाते. अशा येत्या काळात १ कोटी दिव्यांग व अनाथ मुलांचे कल्याण करायचे धेय्य समोर ठेवले आहे. यात १०० टक्के नाही तर २०० टक्के यश मिळेल. ठरवले तर सर्व शक्य आहे, असे आशादायी मत यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.
ताठ बसतात, उत्साह-आनंद आहे, काहीतरो करण्याची धमक ठेवतात त्यांना तरुण म्हणतात. पूर्वी तरुणाई पैशाची बचत, गुंतवणूक करीत आताच्या तरुणांना पैसा का हवाय ? तर खरेदी करण्यासाठी. जगासाठी तरुणाई मार्केटचे टार्गेट झाली आहे, लाईफ म्हणजे शाॅपींग झाली आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. जेवढे बाहेरचे प्राॅडक्ट खाल तेवढे आयुष्य ५ वर्षांनी कमी होत जाईल. आयुष्यात ज्यांना काहीतरी करायचे आहे, त्यांचे पैशामुळे काहीही अडत नाही. माणसात आणि प्राण्यात विचारांचा फरक आहे. माझे काम, माझे घर, माझे कुटुंब यापलिकडे पहायला शिकणे म्हणजे माणूस बनणे होय. जो विचार करतो, दुसर्यांना मदत करतो, दुसर्यांचे प्रश्न सोडवतो तो माणूस. मदत करणे, संवेदनशील असणे, सामाजिक भान असणे, प्रामाणिक व प्रेम भावना असणे ही चांगला माणूस बनण्याची लक्षणे आहेत. आपण सर्वजण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकजण ग्रेट आहात, कृती व सातत्य ठेवले तर जे ठरवाल ते बनाल, सर्वांचे सत्व, तत्व एकच आहे, तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शिवछत्रपती, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, टाटा, अब्दुल कलाम, आनंद दिघेसाहेब अशांचे आदर्श घ्या. चेहर्यावर हास्य व आभार व्यक्त करा, जी स्वप्न पाहिलीत ती सर्व पूर्ण होतील, चांगल्या कामासाठी दान करा आणि महान माणूस बनण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला यजुर्वेंद्र महाजन यांनी दिला. शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केले.
……………………….
चौकट
विलास ठुसे काका व काकू यांनी माझ पालकत्व घेतलय. तर प्रा डाॅ. प्रदीप ढवळसर हे तर माझे मार्गदर्शकच आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी २५ दिव्यांग मुलांचे पालकत्व घेऊन मला मदत केली आहे. भाऊ कुलकर्णी, संपदा, उदय निरगुडकर, माझे सासू-सासरे आदींनी मला खूप मदत केली आहे. टीम म्हणून दीपस्तंभ चे काम चालते. दहीहंडी फोडणारा सर्वांच्या लक्षात राहतो पण यात थर लावणाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे, असे यजुर्वेंद्र महाजन यांनी म्हटले.
