मुंबई : आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे.
राज्याच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन राज्यात नवं सरकार स्थापन केलं होते. दरम्यान, सत्तास्थापनेनतंर शिवसेना कुणाची? हा वाद उफाळून आला होता.
त्यानंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे
