प्रतिनिधी ౹ ठाणे
आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयतील, सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी राजभाषा गौरवदिवस २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. ५०० च्या आसपास विद्यार्थी – विद्यार्थींनींनी दिमाखदार लेझीम रॅली काढत, ग्रंथपालखी खांद्यावर उचलत मराठी गौरव दिवस उत्साहात साजरा केला.
आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनीनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत गात, ढोल ताशांच्या गजरात, भगवे ध्वज फडकवित रघुनाथ नगर परिसरातील ५ किलोमीटर परिसरात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काढलेली ही रॅली फिरत होती. यावेळी नऊवारी मराठमोळ्या साड्या नेसलेल्या विद्यार्थीनी लक्ष वेधून घेत होत्या. तर विद्यार्थ्यांच्या हातात मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देणाऱे फलक नागरिकांना प्रेरित करत होते. याचबरोबर महाविद्यालयात दोन दिवसांचे ग्रंथप्रदर्शनाला विद्यार्थी आवर्जून भेट देत होते.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारी चळवळ पुढे घेऊन जाताना ही मराठी भाषा तरुणांच्या मनामनात रुजावी याकरता साहित्य दिंडीचे व विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांचा अविष्कार दाखविणारा कार्यक्रम घेऊन आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या सभागृहात बहारदार आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रा. हर्षला लिखिते. समन्वयक प्रा. विनायक जोशी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रा. मनोज वाघ आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.
