ठाणे, दि.21 जुलै:- राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. विविध देशांनी विकसित केलेले तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी अवलंब करुन उत्पन्नात घेतलेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच कृषी संबंधी संस्थांना भेटी इत्यादीव्दारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचाविण्याकरिता सन 2025-26 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेचे आयोजन करण्यात येत आहे. या दौऱ्यासाठी नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्त्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाइन्स, चीन व दक्षिण कोरिया इत्यादी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे.
या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी खालील निकष निश्चित करण्यात आले आहेत.
1. अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. तसेच चालू कालावधीचा (मागील सहा महिन्यातील) त्यांच्या नावे 7/12 व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.
2. शेतकऱ्याचे मुख्य उत्पादनाचे साधन शेती असावे व तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2)
3. शेतकऱ्याचे एग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
4. शेतकरी कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. (कुटुंब या व्याख्येमध्ये पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील मुले/मुली)
5. शेतकऱ्याने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
6. शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षे पूर्ण असावे. कमाल वयाची अट नाही परंतू शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. यासाठी या योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर करताना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एमबीबीएस डॉक्टरचे सादर करावे).
7. जर शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली तर त्यास शारीरीकदृष्ट्या तंदुरस्त असल्याबाबत किमान एमबीबीएस डॉक्टरचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
8. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा. पुराव्यासाठी पारपत्राची मुदत/वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पारपत्राची वैध मुदत दौरा निघताना किमान तीन महिने पेक्षा जास्त असावी.
9. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सिए, अभियंता, कंत्राटदार इत्यादी क्षेत्रातील नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणा पत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2)
10. शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौऱ्याचा लाभ घेतलेला नसावा. तसे त्याने स्वतः स्वयंघोषणा पत्रात नमूद करावे. (प्रपत्र-2)
11. शेतकरी निवडीबाबत अंतिम अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव असतील.
या दौऱ्यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 1 लाख अनुदान देय राहिल. योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याची 100 टक्के रक्कम प्रवासी कंपनीकडे आगाउ भरणा करावी लागेल. तसेच देय असलेले 50 टक्के अनुदान दौरा पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर डिबिटीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. प्रवास दौऱ्यामध्ये समाविष्ठ केलेल्या बाबींव्यतीरिक्त इतर बाबी वरील खर्च शेतकऱ्यास स्वतः करावा लागेल.
देशाबाहेर अभ्यास दौऱ्याकरीता ठाणे जिल्ह्यास महिला शेतकरी निवड लक्षांक-1, केंद्र/राज्य कृषी पुरस्कार प्राप्त/पिक स्पर्धा विजेते शेतकरी निवड लक्षांक-1 व इतर शेतकरी निवड लक्षांक 3 असे एकूण 5 शेतकरी लक्षांक प्राप्त झाला असून लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय समिती समोर सोडत पध्दतीने जेष्ठता क्रम निश्चित करुन शेतकरी निवड करण्यात येईल.
या दौऱ्यासाठी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कृषी आयुक्त आयुक्तालयाने 5 ऑगस्ट 2025 अंतिम तारीख दिल्याने इच्छुक लाभार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज सबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये दि.31 जुलै 2025 पर्यंत प्रत्यक्ष सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
