ठाणे, दि.११ सप्टेंबर २०२५ : भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आरोग्य आणि देशांतर्गत पर्यटनाविषयी दोन महत्त्वाची सर्वेक्षणे सुरू केली आहेत. ही सर्वेक्षणे जानेवारी 2025 ते जून 2026 या कालावधीत केली जाणार असून, ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी या सर्वेक्षणाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक संगिता मोरे यांनी केले आहे.
भारत सरकारच्या अधिपत्याखालील सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 80 व्या फेरीचे क्षेत्रकाम माहे जानेवारी 2025 ते जून 2026 या कालावधीत होणार असून, या फेरी अंतर्गत “कुटुंबाचा सामाजिक उपभोगः आरोग्य” व “देशांतर्गत पर्यटन व त्यावरील खर्चाचे सर्वेक्षण” या विषयांवर पाहणी घेण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणाचा उद्देश आरोग्य क्षेत्रविषयी मूलभूत सांख्यिकी माहिती गोळा करणे, शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या वापराचे मोजमाप करणे, सरकारी रुग्णालयांचा वापर किती प्रमाणात होतो, सरकारी व खाजगी क्षेत्रातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, out of pocket expenditure, सर्व वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण, 15 ते 49 वयोगटातील गरोदर महिलांसाठी प्रसूती आणि प्रसूतीपूर्व व प्रसूती नंतर घेतलेल्या उपचारांबाबत तपशीलवार माहिती इ. बाबत सविस्तर माहिती या सर्वेक्षणाद्वारे गोळा केली जाणार आहे. ही माहिती आरोग्य विषयक योजनांची रचना करण्यासाठी वापरली जाणार आहे.
तसेच राष्ट्रीय नमुना पाहणीच्या देशांतर्गत पर्यटन व त्यावरील खर्चाचे सर्वेक्षण या विषयावर देखील सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात देशांतर्गत केलेल्या प्रवासाची माहिती व त्यावर होणारा खर्च यांची माहिती घेतली जाणार आहे. संकलित केलेली माहिती टूरिझम सॅटेलाइट अकाऊंट (TSA) तयार करण्यासाठी वापरली जाईल. ही माहिती पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे गोळा करण्यात येणार आहे. तसेच, पर्यटन मंत्रालय ही माहिती UNWTO (United Nations World Tourism Organisation) ला प्रदान करेल, ज्याच्या आधारे Travel And Tourism Development Index तयार केला जाईल, या सर्वेक्षणातून आलेली माहिती देशाच्या पर्यटन विषयक योजना तयार करण्यासाठी वापरली जाईल. ही माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येते.
सर्वेक्षणाच्या क्षेत्रकामासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. कर्मचारी निवडक भागात प्रत्येक घरात जाऊन आरोग्य विषयक देशांतर्गत प्रवासविषयी माहिती गोळा करणार आहेत. या सर्वेक्षणातून गोळा केलेली माहिती शासनाच्या आरोग्य व पर्यटन विषयक धोरणांसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाची अचूक माहिती मिळण्याच्या दृष्टीने जनतेमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सहकार्यातून अचूक व आवश्यक माहिती मिळणे सोईचे होईल. गोळा केलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
तरी, नागरिकांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक संगिता मोरे यांनी केले आहे.
