ठाणे, दि. 15 सप्टेंबर 2025 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, 95 टक्के ओबीसी व कुणबी समाज गावी जात असताना, शासनाने 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेला जीआर त्वरित रद्द करावा, या प्रमुख मागणीसह कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांच्या पुढाकाराने आज ठाणे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ठाणे शहर शाखा, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई नवी मुंबई शाखा, कुणबी एकीकरण समिती ठाणे-पालघर, ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाणे, भूमिकन्या व भूमिपुत्र संघटना ठाणे, मुरबाड-शहापूर रहिवासी संघ ठाणे तसेच इतर ओबीसी संघटनांची प्रातिनिधिक उपस्थिती होती.
संघटनांनी शासनाकडे निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत:
- दि. 2 सप्टेंबर रोजी काढलेला हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर तातडीने रद्द करावा.
- जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
- ठाणे शहरात 100 मुलं व 100 मुलींसाठी ओबीसी वसतिगृह त्वरित सुरू करावं.
- महाज्योतीचं कोकण विभागीय कार्यालय ठाणे शहरात सुरू करावं.
- शामराव पैजे महामंडळाला 500 कोटींचं अनुदान द्यावं.
- तसेच निवेदनातील इतर मागण्या तातडीने मंजूर कराव्यात.
अशा विविध मागण्या साठी तहसीलदार ठाणे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलना दरम्यान वक्त्यांनी स्पष्ट केलं की, गरजू मराठा समाजाला शासनाने मदत करावी याला कुणबी समाजाचा विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणातून दिली जाणारी मदत कधीही मान्य केली जाणार नाही. वारंवार होणाऱ्या कुणबी दाखल्यांच्या दुरुपयोगामुळे ओबीसी समाज अस्वस्थ व भयभीत झाला आहे.
शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा ओबीसी समाज आणखी तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
प्रमुख आंदोलनस्थळी मा. तहसीलदार ठाणे यांचे कडे निवेदन सादर करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासनापर्यंत ओबीसी समाजाचा आक्रोश पोहोचविण्यात आला.
यावेळी वरील संघटनांचे पुढील पदाधिकारी उपस्थित होते.
बबन उंडरे, मिलिंद महाडीक, अशोक विशे, शांताराम म्हादवे, राजेंद्र जोशी, पुनित खांडेकर, सुरेश कानल सुवर्णा पाटील, सविता महाडीक, निलेश मुंडे, वैभव भेकरे, समीर पेंढारे, मोहन म्हापार्ले, वंदना रेवाळे, लक्ष्मी महाडीक, नितीन भोसले, अरुणा पेंढारे, यशवंत बावकर, पी एन पाटील, सुवर्ण पाटील, किसन बोंद्रे, आनंद महाडीक, गुरुनाथ पाटील, लहू देसले, दशरथ हरड, गुरुनाथ निपुरते, कृष्णा सांगळे आणि बरेच कुणबी सक्रिय समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते.
