मुंबई, दि. ०२ ऑक्टोबर २०२५ : “गरबा हा केवळ नृत्याचा उत्सव नाही, तर समानतेच्या विचारांचा उत्सव आहे” – या जाणिवेतून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबईतर्फे दादर येथील आंबेडकर भवनात ‘समतेचा गरबा’ आयोजित करण्यात आला.
धर्म, जात, लिंग यांच्या भिंती ओलांडून १० ते ७० वयोगटातील स्त्री-पुरुषांनी या उपक्रमात रंगून गेले. विविध धर्मातील लोक एकत्र नाचले, गाणी म्हणाली आणि एकत्र आल्याचा आनंद अनुभवला.
या वेळी अंनिसचे नंदकिशोर तळाशीलकर, विजय परब, सुधीर निंबाळकर, संदीप गोवळकर, संदेश बालगुडे,यश, रुपेश, मुंबई फॉर पीस चे संध्या गोखले व हसीना, मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील मिहिर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
‘समतेचा गरबा’ हा फक्त एका संस्थेचा नव्हता, तर अनेक संघटनांच्या सामूहिक प्रयत्नांचा मिलाफ होता. मुंबई फॉर पीस, बेबाक कलेक्टिव्ह, मुसे फाऊंडेशन, संविधान प्रचारक, हलवा, सेंटर फॉर प्रमोटींग डेमॉक्रसी, परचम कलेक्टिव्ह, नीलम सोशल, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज यांसारख्या संघटनांनीही या उपक्रमाला हातभार लावला.
हा उपक्रम अंनिस मागील पाच वर्षांपासून राबवत असून समविचारी संघटनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अंनिसच्या मते – “समाजाला एकत्र आणणारा प्रत्येक प्रयत्न म्हणजे संविधानिक मूल्यांना बळ देणारी चळवळ आहे. लोकांच्या मनातील भिंती तोडून समतेचा मार्ग तयार करणे .”
‘समतेच्या गरब्या’तून समाजाला संदेश मिळाला की खरी ओळख धर्म, जात वा लिंग नव्हे; तर माणूसपणच आहे. असे यावेळी आयोजकांनी सांगितले.
