मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आझाद मैदानावर कुणबी बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय.
कुणबी समाजाचं मुंबईतील आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मंत्री लोढांनी दिला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आझाद मैदानावर कुणबी बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय.
मुंबई,, दि. 9 ऑक्टोबर 2025 : मराठा समाजाला कुणबी नोंदींद्वारे ओबीसी आरक्षणाचा लाभ देणाऱ्या राज्य सरकारच्या शासन निर्णयाला (जीआर) तीव्र विरोध करत कुणबी समाजानं आझाद मैदानावर भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं. कोकणासह सात जिल्ह्यांतील हजारो कुणबी बांधव या आंदोलनात सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आझाद मैदानावर कुणबी बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय.
कुणबी समाजावर अन्याय होऊ देणार नाही-मंगलप्रभात लोढा : कुणबी बांधवांशी संवाद साधताना लोढा म्हणाले की, “पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री स्वतः येऊ शकले नाहीत, पण त्यांनी मला तुमच्या भावना ऐकून घेण्यासाठी पाठवलं आहे. आठवड्याच्या आत कुणबी समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. ओबीसी समाजासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीपुढे तुमचा विषय ठेवला जाणार आहे. तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, याची खात्री देतो. तुमच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा आणि आंदोलन स्थगित करा”, असं आवाहन त्यांनी केलं.
कुणबी शब्दावर विश्वास ठेवणारा समाज – अनिल नवगणे : कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी लोढा यांच्या शब्दाला मान देत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. नवगणे म्हणाले, “मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला शब्द दिला आहे, की आठवड्याच्या आत आमच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल. आम्ही शब्दावर विश्वास ठेवतो. पण सरकारनं आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. मराठा समाज जसा बोलेल तसंच सरकारनं चालू नये. जर असं झालं, तर कोकणातील कुणबी आणि ओबीसी समाज एकवटेल. आम्ही सहनशील आहोत, पण गरज पडली तर आक्रमकही होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर पुढचा निर्णय घेऊ”, असं त्यांनी सांगितलं.
आंदोलनाचं कारण काय ? : दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारनं मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या पूर्वजांच्या नोंदीत ‘कुणबी’ किंवा ‘मराठा-कुणबी’ असा उल्लेख आहे, त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा जीआर जारी केला. हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारावर शोधलेल्या 58 लाख नोंदींमुळे लाखो मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. यामुळे मूळ कुणबी आणि इतर ओबीसी जातींना धोका निर्माण झाल्याची भीती कुणबी समाजाला आहे. याच मुद्द्यावर कुणबी समाजानं आझाद मैदानावर आज एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं.
