ठाणे,दि.23 :- येत्या 25जानेवारी रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 16 व्या राष्ट्रीय मतदार दिनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नव्या मतदारांना प्रोत्साहित करणे, हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक श्री. हेमंत ढोमे उपस्थित राहणार आहेत. तसेच कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये श्री.रवींद्र पाजणकर (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे), श्री. अरुण करमरकर (ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक), श्रीमती क्षिती जोग (निर्माती व अभिनेत्री), श्री. अमेय वाघ (अभिनेता), श्री. हरीश दुधाडे (अभिनेता), निवडणूक दूत (Election Ambassadors) लोकशाहीचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नियुक्त केलेले निवडणूक दूत, नीता केणे (किन्नर अस्मिता), श्री.अशोक भोईर (अध्यक्ष, अपंग विकास महासंघ, कल्याण), श्री.कॅस्पर ऑगस्टीन (अध्यक्ष, ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन) देखील यावेळी उपस्थित असणार आहेत.
हा कार्यक्रम दि.25जानेवारी, 2026, सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नियोजन भवन, पहिला मजला येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) आणि अपर जिल्हाधिकारी श्री.हरिश्चंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने, मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील, श्री.राजेंद्र चव्हाण, श्री. संदीप थोरात आणि श्री. सर्जेराव मस्के-पाटील विशेष परिश्रम घेत आहेत.
“माझा भारत, माझं मत” हा मंत्र उराशी बाळगून आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवमतदारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
